स्मार्ट मीटर, वीज दरवाढी विरोधात भाकपची निदर्शने

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने केली. एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे, जबरदस्ती व गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कैलासनगर, दादा कॉलनी, शंभू नगर, भावसिंगपूरा, वाळूज , एकतानगर, बीड बायपास व शहरातील इतर भागात लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा, छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी कार्यालये व सरकारी निवासस्थानावर लावलेले स्मार्ट मिटरही तातडीने काढुन घेतले पाहीजे आदी मागण्या मांडण्यात आल्या. 
याबाबत विविध पक्षसंघटनांची कृती समिती करून कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी भाकप राज्य कौन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी अ‍ॅड. अभय टाकसाळ, जफर फजलू रहमान, राजू हिवराळे, रफीक बक्श, मधुकर गायकवाड, एजाज शेख, लाल बावटा, रिक्षा युनियनचे शेख अमजद शेख पाशु, शेख नुर, संतोष काळे, किशोर हरिश्चंद्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.