छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः कोर्टात सुरू असलेल्या केसच्या संदर्भात वकिलाला भेटण्यासाठी गेलेल्या एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना हायकोर्ट उत्तरेकडील गेट जवळ घडली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम साहेबलाल शेख रा अजीम कॉलनी जुना बाजार यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी हायकोर्टातून बाहेर पडले व कोर्टाजवळील सिग्नल जवळून डावीकडे दुचाकीवरून निघाले होते.
कोर्टाच्या उत्तरेकडील गेटच्या पुढे निघाले असता पाठीमागून एका दुचाकीवर तीन जण आले. त्यांनी फिर्यादी चालवत असल्या मोटरसायकलला लाथ मारली. फिर्यादींना खाली पाडले व उठण्याचा प्रयत्न करत असताना तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा चार अनोळखी इसम आले. तू बहुत केस लढ रहा है, तू खतम...केस खतम असे म्हणत आरोपींनी तसेच दोन-तीन बुरखाधारी महिलांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा उजवा पाय मोडला, तसेच एकाने लोखंडी रॉडने उजव्या पायावर मारून जखमी केले. आरोपींनी फिर्यादींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी वकिलांना देण्यासाठी आणलेले दीड लाख रुपये, मोबाईल तसेच कागदपत्रे आरोपींनी हिसकावून घेतली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
महिलेचे मंगळसूत्र लंपास
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः दांडिया खेळून परत घरी परत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना 29 सप्टेंबर रोजी मोहटादेवी मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी महिला पतीसह मोहटा देवी मंदिराच्या बाजूला सुरू असलेल्या दांडियाच्या कार्यक्रमात गेली होती. मैत्रिणी सोबत दांडिया खेळून झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्या बाहेर पडल्या असता गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.