भाजप नेते तातडीने मुंबईत ः वरिष्ठांचा सिग्नल येताच होणार घोषणा
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः नगरपालिका निकालापर्यंत महायुती टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, काही महिन्यांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी असे वक्तव्य केले होते. आता या वक्तव्याची सत्यता प्रत्यक्षात येत आहे. महानगर पालिका निवडणुकीतच महायुतीचे शकले होण्याची चिन्हे असून छत्रपती संभाजीनगरातील महायुती तुटण्याच्या बेतात आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचा ५०-५० टक्के जागांचा फार्म्यूला भाजपला मान्य नाही. त्यामुळे मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत. वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल मिळताच भाजप स्वबळाची घोषणा करू शकते.
नगर पालिका नगर पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात राज्यात भाजपने घवघवीत यश मिळविले आहे. जिल्ह्यात भाजपला फारसे यश मिळाले नसले तरी महापालिकेत मात्र भाजपला शतप्रतिशत यशची खात्री आहे. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शहरातील परिस्थिती बदलली, असा दावा भाजप नेते करीत आहेत. त्यामुळे आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आ. संजय केणेकर यांना भाजपसाठी जास्त जागा हव्या आहेत. विधानसभेप्रमाणे दोन शिवसेनेत लढत झाल्यास भाजपला मार्ग मोकळा होऊ शकतो, असे गणित भाजप नेते मांडत आहेत. कट्टर हिंदूत्ववादी भुमिका घेऊनच मनपा निवडणुकीला सामोरे जाण्याचे भाजपने निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याने केणेकर ही बाब मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरविण्याची चिन्हे आहेत.
सावेंची नाराजी...
दुसरीकडे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत मागे पडलेले मंत्री अतुल सावे यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी फारसे जुळलेच नाही. भाजप आमदारांचा निधी पालकमंत्री शिरसाट यांनी अडकवून ठेवला आहे. शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग असो की इतर महत्वाची विकास कामे शिरसाट-सावे यांच्यात कायमच बेबनाव दिसून आला. त्यातच कॅश बॅग कांड मुळे शिंदे गट आणि भाजपत अविश्वासाची ठिणगी पडली. त्यानंतर वीटस् हॉटेल लिलावाचा वाद असो की पुण्यातील जमीन या सर्व कारस्थानाच्या पाठीमागे भाजपच आहे, अशी शंका पालकमंत्री शिरसाट यांना आहे. त्यामुळेच सावेंशी सख्य झालेल्या जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना त्यांनी खड्यासारखे बाजूला केले. परिणामी शिरसाट एकला चलो रेच्या भुमिकेत आले. पालकमंत्री या नात्याने मिळालेला मोठा निधी त्यांनी नव्याने शिंदे गटात आलेल्या नेत्यांकडे वळता केला. यावरून शिंदे गटात महाभारत झाले. त्याचे खापर मंत्री सावे आणि जंजाळ यांच्यावर फोडण्यात आले.
कार्यकर्त्यांना हवा शतप्रतिशत भाजप...
लोकसभा त्यानंतर विधानसभेत महायुतीचे काम करून इतर पक्षांना फायदा पोहोचला, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे. भाजप हा केडर बेस पक्ष आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची मेहनत, आरएसएस, बजरंग दल, विहिंप या व इतर संलग्न संघटनांचे जाळे यामुळे शहर आणि जिल्ह्यात पक्ष मजबूत आहे, असा दावा केला जातोय. विरोधी पक्षांकडे नेतेच नाहीत, ठाकरे गट सोडला तर इतर पक्षांकडे वार्डनिहाय कार्यकर्त्यांची मजबूत फळी नाही. परिणामी कमी जागा पदरात पाडून घेणे भाजपला परवडणारे नाही. एकवेळ वेगळे लढून बघा, असा घोषा कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला आहे.
तीन बैठकातही तोडगा नाही...
महापालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के जागा घेण्यास सावेंची तयारी होती. मात्र आ. संजय केणेकर, खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर आदींनी प्रखर विरोध दर्शवला. महायुतीत भाजपच मोठा भाऊ आहे, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपला महापालिकेच्या ७० जागा हव्या आहेत. तर शिंदे गट प्रत्येक प्रभागात दोन जागावर अडून आहे. परिणामी स्थानिक नेत्यांच्या बैठका वांझोट्या ठरल्या.















