केबल जोडणीचे काम पूर्ण; संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाड्याचे वैभव आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्यानातील रोहित्राची केबल जळाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून उद्यान बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुट्टीच्या काळात उद्यानाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत होते.

अखेर संबंधित विभागाकडून केबल जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले असून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उद्यानाचे दरवाजे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर उद्यान हे पैठणच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असून येथे दररोज विविध भागांतून पर्यटक, लहान मुले आणि सहलीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. उद्यानातील संगीत कारंजे, आकर्षक विद्युत रोषणाई, हिरवळ आणि निसर्गरम्य परिसर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

मात्र, केबल जळाल्यामुळे उद्यान बंद ठेवण्याची वेळ आल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. विशेष म्हणजे, किरकोळ दुरुस्तीअभावी पर्यटनस्थळ बंद राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
केबल जोडणीचे काम पूर्ण पर्यटकांना पुन्हा उद्यानाचा आनंद घेता येणार आहे. 

दरम्यान, भविष्यात अशा तांत्रिक बिघाडांमुळे उद्यान बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागाने विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल करावी, तसेच किरकोळ खर्च करण्यासाठी रोजच्या उत्पन्नातून विशिष्ट रक्कम बाजूला ठेवण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून, उद्यान विकास समिती व उद्यान दबाव गटातर्फे करण्यात आली आहे. केबल जोडणीचे काम पूर्ण झाल्याने शनिवारी संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा सुरू झाले असून पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.