नवी दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरातील युधिष्ठिर सेतूवर १७ आणि १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने सुरुवातीला एका ऑटोला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात आणखी ६ जणांना चिरडलं. या अपघातात जखमी झालेल्या ८ जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अत्यंत वेगात होती. याच वेगात चालकाने युधिष्ठिर सेतूवर एका ऑटोला धडक दिली. रिक्षाला धडक दिल्यानंतर तिथे थांबून मदत करण्याऐवजी चालकाने कार पळवण्याचा प्रयत्न केला.
पळून जाण्याच्या याच गडबडीत कारने रस्त्यावरील आणखी ६ जणांना चिरडलं. त्यामुळे धडकेनंतर हा अपघात अधिकच भीषण झाला. अखेर काही अंतरावर जाऊन ही कार थांबली. अपघातानंतर ८ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोघांचा मृ्त्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी आता एफआयआरमध्ये () कलम १०८ देखील समाविष्ट केलं आहे. अपघातास जबाबदार असलेला आरोपी चालक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. तो फरार असून पोलीस पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत.