कल्याण : कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पिडीत तरुणीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार , २२ वर्षांच्या पिडीत विवाहित तरुणी हिचा पती सोबतवाद असल्याने त्या वादात मध्यस्ती करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या खाजगी मालमत्ता येथे घेऊन येत तिला शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा या पिडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरचा केअर टेकर याने पिडीत तरुणीला तिच्या घरी आणून सोडले.
दरम्यान, घाबरलेल्या पिडीत तरुणीने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्या संबंधी आपल्याकडे व्हिडिओ व मोबाईल व्हॉट्सअॅप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर पिडीत तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.