छत्रपती संभाजीनगर, ( सांजवार्ता ब्युरो) : थकबाकीचे बिल न मिळाल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांचे शासकीय वाहन अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सरपंच व कंत्राटदार मंगेश साबळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस हवालदार वसुदेव संभाजी कातकडे यांनी क्रांतीचौक पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी मंगेश साबळेचे जिल्हा परिषदेकडील काही कामाचे बिल थकीत होते. हे बिल मिळत नसल्याच्या कारणावरून तो ८ जून २०२६ रोजी सकाळी ११:४० ते १२:०० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयात आला होता. त्याच वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. या एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे जाण्यास निघाल्या होत्या.
मिन्नू पी. एम. दालनातून बाहेर पडत असताना आरोपीने त्यांच्या दालनासमोरच बिलाच्या संदर्भाने मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम शासकीय वाहनात (क्र. एमएच २०-जीझेड-५१३२) बसून निघत असताना आरोपीने त्यांचे शासकीय वाहन समोर येऊन अडवले. शासकीय कर्तव्य पार पाडत असताना
महिला अधिकाऱ्यांचे वाहन अडवून, त्यांना जाण्यापासून रोखून अटकाव केल्याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मंगेश साबळेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions