छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): क्लिनिक सुरू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपयांचा हुंडा आणावा यासाठी डॉक्टर विवाहितेचा छळ करत, तिच्यावर मांत्रिकाकरवी अघोरी विद्या आणि जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला. पल्लवी शुभम चांदवडे (वय २८, रा. अष्टविनायक मार्केट, शिवाजीनगर) यांच्या तक्रारीवरून पती, सासू-सासऱ्यांसह सासरच्या मंडळींविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगरातील अष्टविनायक मार्केट परिसरात राहणाऱ्या पल्लवी शुभम चांदवडे (२८) हिचा विवाह दि. २० एप्रिल २०२४ रोजी जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेडा येथील शुभम गणेश चांदवडे याच्याशी झाला आहे. लग्नावेळी सोने, फर्निचर आदी सहित्य
देण्यात आले. मात्र, लग्नाच्या दिवशीच बिदाईच्या वेळी पतीने 'तुला गाडीखाली फेकून द्यावेसे वाटते' असे म्हणत धमकी दिली. लग्नानंतर काही दिवस सासरी राहिल्यानंतर दाम्पत्य नाशिक येथे वास्तव्यास गेले. त्यानंतर पती, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकडून किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. पल्लवीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत तिला वारंवार एका मांत्रिकाकडे घेऊन जात होते. तेथे अंगारा लावून मंत्रोच्चार केले जात होते. मंत्रोच्चार केला नाही तर तो मांत्रिक काठीने मारहाण करीत असताना सासरचे लोक तिला पकडून ठेवत होते, असे तक्रारीत नमूद केले आहे. दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी क्लिनिक सुरू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. पैसे न दिल्यास फारकत देऊ अथवा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions












