वैजापूर, (प्रतिनिधी) : शिवना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकांविरुद्ध शिऊर पोलिसांनी कारवाई करत १३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाभुळगाव शिवारातील कानिफनाथ मंदिरासमोर गस्तीदरम्यान संशयित बाहनाची तपासणी करण्यात आली.
यावेळी (एमएच २० जीसी २२९१) टेम्पो अवैधरित्या बाळू वाहतूक करताना आढळून आला. तपासणीदरम्यान वाहनामध्ये झोलेगाव शिवारातील शिवना नदीपात्रातून विना रॉयल्टी उपसा केलेली अंदाजे दोन ब्रास वाळू आढळून आली. तसेच चालकाकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी बाबासाहेब ज्ञानेश्वर कदम (२७, रा. भायगाव गंगा, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान १३ लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो व १२ हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण १३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हवालदार गणेश मच्छिंद्र गोरक्ष यांनी फिर्याद दिली असून शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अंमलदार सबिता वरपे करीत आहेत.











