मी अ‍ॅक्सिसमध्ये असताना माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणे झाली, अमृता फडणवीसांची धक्कादायक माहिती

Foto
मुंबई : नाशिकच्या टीसीएस कंपनीत गेल्या चार वर्षांपासून लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणे आदी प्रकार सुरू होते, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू असलेले गंभीर प्रकार समोर आले. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भाष्य केलं असून अ‍ॅक्सिस बँकेत असताना त्यांच्यासमोरही असे प्रकार घडले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

अशी प्रकरणे पाहिली की खराब वाटतं. खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये असं होतंय. मी अ‍ॅक्सिस बँकेत होते, तेव्हाही माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली आहेत. त्याविरोधात व्हिसल ब्लोइंग (एखाद्या संस्थेतील भ्रष्टाचार, बेकायदेशीर कृत्य किंवा अनैतिक व्यवहारांची माहिती अधिकृतपणे उघड करणे) होऊन कायदेशीर आणि कॉर्पोरेट कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. त्यामुळे असं काही झाली की व्हिसल ब्लोइंग करणं गरजेचं आहे. समाजाला आणि आपल्या वरिष्ठांना सांगणं गरजेचं आहे, तरच यावर आळा घालता येईल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नाशिकचं टीसीएस प्रकरण नेमकं काय?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक प्रकल्पात सहकारी कर्मचार्‍यांकडून घडलेल्या गैरकृत्यांविषयी पीडितांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार, आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावणे, अश्लील टिप्पणी करणे, शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे आदी तक्रारींचा अंतर्भाव आहे. टीसीएस नाशिकमध्ये सुमारे २०० कर्मचारी काम करतात. यात निम्मे प्रमाण महिलांचे आहे.

पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेत तक्रारींची चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या पुणे आणि मुंबई कार्यालयातील मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाचे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या घटनाक्रमानंतर व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांना सध्या ङ्गवर्क फ्रॉम होमम अर्थात घरून काम करण्यास सांगितले आहे.

कंपनीतील गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने तसेच कामगार उपायुक्त विभागाचे दुकान निरीक्षक विशाल जोगी यांनी टीसीएसमध्ये स्वतंत्रपणे भेट देऊन माहिती घेतली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कंपनीत पॉश कायद्याची अंमलबजावणी करण्यासााठी अंतर्गत समिती आहे. या समितीच्या वर्षभरात झालेल्या बैठकीची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. कंपनीच्या प्रवेशद्वारावर या समितीचा फलकही अस्तित्वात आहे.