गणेशात्सव शांतता, सलोखा राखून साजरा करा

Foto
▶ वाळूज येथे शांतता समितीची बैठक
▶ पोलिस प्रशासनाचे आवाहन

वाळूज महानगर, (प्रतिनिधी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाळूज पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा
करावा असे यावेळी पोलिस प्रशासनासह सर्वांनीच आवाहन केले. 

प्रारंभी उपस्थित गणेश मंडळासह शांतता समिती सदस्यांनी असंख्य उपयुक्त सुचना मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये निदान दहा दिवस तरी विजपुरवठा खंडीत करू नये, विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, कमळापूर रोडवर वाढती वाहतुक पाहता त्याठिकाणी शहर वाहतुक पोलिसाची नियुक्ती करावी आदीचा समावेश आहे. बैठकीत अवैध दारू ठिकाणे उधवस्त करून गणेशोत्सवात होणारा दारुड्याचा त्रास दुर करण्याची मागणी यावेळी अनेकांनी लावून धरली. 

शेवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उपस्थितांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन पोलिस अधिक सतर्क राहील असे सांगितले. माञ कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये असे सांगून त्यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस पाटील तसेच नागरिकांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहीजे. 

गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाचा मर्यादित व नियमांनुसार वापर करावा, मिरवणुकीचे योग्य नियोजन करावे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, मंडप परिसरात सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 

बैठकीत गावकर्यांसह गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले. नागरिकांनी गणेशोत्सव काळातील संभाव्य अडचणी, वाहतूक व्यवस्था, मिरवणूक मार्ग तसेच सुरक्षेबाबत विविध सूचना मांडल्या. वरिष्ठ नागरिकांनीही शांतता, बंधुभाव व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले. 

बैठकीस सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बोडखे, पोउपनि. संभाजी गोरे, शासकीय विभागाचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, गणेश महासंघ पदाधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आदीची मोठी उपस्थिती होती. बैठकीचे सुत्रसंचालनासह सर्वाचे आभारप्रदर्शन हेडकॉ. पांडुरंग शेळके यांनी केले.