लोकसभेच्या निकालावर ठरणार मनपा स्थायी समिती सभापती

Foto

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाकरिता आता केवळ चार दिवस शिल्‍लक असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत काही भाजप नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक येत्या 4 जूनला होणार असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर स्थायीचा सभापती ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात एकायला मिळत आहे. 

गेल्या तीन दशकापासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्यांदाच विकासकामावरून युतीच्या उमेदवाराच्या मोठी कोंडी झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजप-शिवसेना युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या काही नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांचे काम केले नसल्याची चर्चा उघडपणे पाहायला मिळाली. स्वतः खैरे यांनीही तसे उघडपणे सांगितले. त्यानंतर युतीतील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. भाजपच्या हट्टापायी निवडणुकीपूर्वी शिवसेनेने जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतरही निवडणुकीदरम्यान असा प्रकार घडल्याने शिवसेनेच्या वर्तुळात नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. मनपाची अर्थपूर्ण समिती मानल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड 4 जून रोजी होणार आहे. यंदाचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला येणार आहे. तत्पूर्वी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यात युतीचा उमेदवार विजयी झाला तर या सर्व चर्चांना ब्रेक लागेल व स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक युती धर्माप्रमाणेच होईल;परंतु जर निकाल वेगळा लागला तर मात्र शिवसेना स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला सहकार्य करणार नसल्याचे समजते.  तसेच आशा परिस्थितीत शिवसेनेचा सभापती होणार असल्याची चर्चा एकायला मिळत आहे. लोकसभेत युतीचा उमेदवार विजयी झाला तरी भाजपचा सभापती पदाचा उमेदवार कोण? यावरही बरेच काही अवलंबून आहे.सभापतीपदासाठी भाजपकडून सध्या पूनम बमणे, राजू शिंदे यांच्यासह शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल आदींच्या नावाची चर्चा आहे. यातील बमणे यांनी खैरे यांचे काम केले नसल्याचे बोलले जाते. ते सभापतीपदाचे उमेदवार असल्यास शिवसेना कितपत सहकार्य करेल, याबाबत साशंकता व्यक्‍त करण्यात येत आहे. अर्थात त्यांनी युतीच्या उमेदवाराचे काम केले की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होईलच.

स्थायी समितीतील पक्षनिहाय बलाबल
महापालिका स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचे 5, एमआयएम 5, भाजप 3, शहर विकास आघाडी 2, तर काँग्रेसचा 1 सदस्य आहेत.