पाणी उपलब्धता प्रमाणपत्राअभावी चांदेश्वर प्रकल्प रखडला; मंजुरी द्या

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील उत्तर डोंगराळ भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाकला-चांदेश्वर (हत्तीघोडा) साठवण तलाव प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

मुंबईतील देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन त्यांनी हे निवेदन दिले. प्रकल्पासाठी २.०१ दलघमी पाण्याची तरतूद शासनाच्या जल आराखड्यात करण्यात आली आहे. तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाने मे २०२४ मध्ये पाणी उपलब्धतेस सहमती दिली आहे. जलसंपदा विभागाने एप्रिल २०२५ मध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी प्रस्तावही सादर केला.

 मात्र, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वैजापूर तालुक्यातील २० ते २२ गावांमधील सुमारे ५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला तातडीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणि प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.