अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील अखेर विजयी झाले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. क्षणाक्षणाला आकडे बदलत होते. कधी खैरे आघाडीवर तर कधी जलील आघाडीवर होते. मात्र, अखेच्या क्षणी जलील यांनी बाजी मारली.
सुरुवातीला चौरंगी वाटत असलेल्या या लढतीत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यातच खरी लढत बघायला मिळाली. शिवस्वराज्य बहुजन पक्षच हर्षवर्धन जाधव यांनीदेखील चांगले मते मिळवली. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळेच खैरे यांचा पराभव झाला असल्याची चर्चा आहे. इम्तियाज जलील यांना एकूण ३ लाख ८७ हजर ५२९ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८१ हजार ७४५ मते मिळाली. तर तिसरी क्रमांकावर असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८१ हजार ७२१ मते मिळाली आहेत.
मतमोजणीस्थळी एमआयएम समर्थकांकडून दगडफ़ेक
मतमोजणी स्थळी एमआयएम समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतमोजणनी चालू असताना कधी खैरे तर कधी जलील आघाडी घेत होते यामुळे दोन्ही बाजूचे समर्थक आक्रमक होत होते. तुलनेने एमआयएम समर्थक खूप जास्त होते. एकवेळ तणाव एव्हढ वाढला कि एमआयएम समर्थकांनी दगड भिरकावण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टाळला.