चंद्रपूर प्रकरण तापले, उद्धव ठाकरेंकडून दखल; नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण, कारवाईचे संकेत!

Foto
मुंबई : चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच भाजपाला पाठिंबा देणार्‍या चंद्रपूरमधील उद्धवसेनेच्या नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

चंद्रपूरला घडले, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका नाही. चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्ले त्यांच्यावर कारवाई होईल. चंद्रपूरमध्ये आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला, ती आमची भूमिका नाही. त्यांचे आम्ही समर्थन करत नाही.  स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल. चंद्रपूरच्या घटनेचे पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेसाठी जाण्याची पक्षाची भूमिका नाही. मुंबईच्या महापौर संदर्भात भूमिका घेतली, जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूरमध्ये काही भूमिका घेतली असेल तर पक्ष त्याची दखल घेईल, असे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
 
चंद्रपूर प्रकरणाकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष

चंद्रपूर प्रकरणात स्वत: उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. कदाचित दोन-तीन दिवसात त्यांना मुंबईत पाचारण केले जाईल. उद्धव ठाकरे यांची कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मदत करण्याची भूमिका नव्हती आणि नाही. ज्या भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरण्यास मदत केली. अशांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. यावर कोणी सूपर उद्धव ठाकरे झाले असतील तर माहिती नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
 
दरम्यान, चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका आणि संस्कृती काँग्रेसची नाही. त्यांनी भाजपला मतदान करणे ही राजकीय चूक आहे. या चुकीचे पक्ष पातळीवरून समर्थन करणे आणि काँग्रेसची लाज काढणे म्हणजे, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून परभणीत आघाडी धर्म पाळला आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत शिवसेना काँग्रेसची मते घेते. पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर आणि परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती.