पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गुडघ्याला बाशिंग बांधत औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. आघाडीचा जागावाटपाबाबत अद्यापही तिढा सुटलेला नसला तरी या जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस ने केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत संकेत दिल्याचेही आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. दरम्यान २६ जानेवारी रोजी चव्हाण यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त "भावी खासदार" असा केक तयार करून सरप्राईज दिले. आमदार सतीश चव्हाणांनीही हा भावी खासदारकीचा केक कापून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना टक्कर देण्यासाठी आपली कंबर कसली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघ शिवसनेच्या ताब्यात आहे. तीन टर्म पासून खासदार चंद्रकांत खैरे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतात. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकांचे एकमत झाले असून त्यांचा पराभव निश्चित असल्याच्या विश्वास आमदार सतीश चव्हाणांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. आमदार चव्हाण म्हणाले कि जर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी झाली तर आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देऊ. मात्र न झाल्यास या मतदार संघातून राष्ट्रवादीच लढेल असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार खैरे यांनी केवळ भावनिक राजकारण करून सत्ता काबीज केली आहे मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचे चव्हाण ठासून सांगत आहेत.
निर्धार परिवतर्नाचा या संवाद यात्रेत शक्तीप्रदर्शन
निर्धार परिवतर्नाचा या संवाद यात्रेत राष्ट्र्वादीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, बजाजनगर येथे आपले शक्तीप्रदर्शन केले होते. या यात्रेत विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फोजीया खान यांनी शिवसेनेच्या आणि खासदार खैरेंच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यामुळे परिवर्तन झालच पाहिजे, हे सरकार गेलच पाहिजे अशी हाक राष्ट्रवादीने या यात्रेतून दिली. गंगापूर आणि बजाजनगर येथील जाहीर सभेला प्रतिसाद पाहता आगामी काळात खासदार चंद्रकांत खैरे यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत.
सतीश चव्हाण हेच भावी खासदार
आमदार सतीश चव्हाण यांनी जरी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात औरंगाबाद लोकसभा मतदार संघात रणशिंग फुंकले असले तरी त्यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण हेच खासदार होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या आमदार सतीश चव्हाण हेच भावी खासदार अशा अश्ययाच्या पोस्ट व्हायरल होत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेला भावी खासदारकीचा केक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.