सिल्लोड, (प्रतिनिधी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देत त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड करण्यासाठी सिल्लोड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विशेष मदतवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ३३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण ३३ लाख रुपयांच्या शासकीय आर्थिक मदतीचे धनादेश तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या जनावरांच्या बाबतीत २१ शेतकऱ्यांना ८ लाख ११ हजार रुपयांचे वितरित करण्यात आले.
विशेष म्हणजे, केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून या कुटुंबांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा, महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना सोयीचे व्हावे यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. शासनाच्या आर्थिक मदतीसोबतच कुटुंबातील महिला आणि विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून करण्यात आलेल्या या मदतीमुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत खचून न जाता धीर धरावा. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी, शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. संकट कितीही मोठे असले तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मदतकार्य सर्वसमावेशक असून गरजू आणि संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शेताच्या बांधावर जाऊन गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असून त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून मनाला आत्मिक समाधान मिळते. संकटाच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आधार देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. शेतकरी, शेतमजुरांची अडवणूक खपवून घेणार नाही मदतीच्या रकमेत वाढ केली.
पात्र लाभार्थ्यांना वाढीव मदत वितरित करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या. मदतीपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आगामी आठ महिन्यांचा कृती आराखडा तयार करावा. या आराखड्यात जलसंधारण आणि जलसिंचनाची कामे प्राधान्याने हाती घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना सीबिल किंवा अन्य तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शासकीय लाभापासून वंचित ठेवू नये. पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम वेळेत वितरित करावी. यासाठी दर आठवड्याला बँक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गरजू नागरिकांवर अन्याय होत असेल तर तो दूर करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन, बँका, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांच्या भविष्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आमदार सत्तार यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार तुकाराम बनकर, पुरवठा नायब तहसीलदार बळीराम मुंडे, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे सह आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्य, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












