मुंबई : सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी, यासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा अगदी जाहीरपणे प्रकट केली नसली तरी पडद्यामागून त्यांचे या जागेसाठी लॉबिंग सुरु असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर आपले पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी छगन भुजबळ हे आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
एका भुजबळ समर्थक नेत्याने सूत्रांना या सगळ्याबाबत एक रंजक माहिती दिली. छगन भुजबळ हे राज्यसभेवर आणि पुतण्याला मंत्रिमंडळात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आणि विरोधकांकडून राजकीय घराणेशाहीचा आरोप केला जाऊ शकतो. मात्र, राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यात आले. सुनील तटकरे खासदार असताना मुलीला राज्यात कॅबिनेट मंत्री केले. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यात उपमुख्यमंत्री, त्यांचा मुलगा पार्थ पवार दिल्लीत खासदार, मग इतरांच्याबाबत हे सूत्र लागू का केलं जात नाही?, असा रोकडा सवाल भुजबळ समर्थक नेत्याने उपस्थित केला आहे. मात्र, या नेत्याने याबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला.
छगन भुजबळ हे सध्या राज्यात अन्नपुरवठा आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. अजित पवार हयात असताना छगन भुजबळ आणि त्यांच्या वितुष्ट निर्माण झाले होते. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता. किंबहुना मराठा आंदोलनाविरोधात पहिल्यांदा ओबीसी नेता म्हणून ठामपणे उभे राहणारे छगन भुजबळ हेच होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसत होता. याबाबत त्यावेळी अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत नाराजीही बोलून दाखवली होती. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते. पक्षाला किंमत मोजावी लागते, असे अजित पवार यांनी म्हटले होते.