छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः अखेर भाजप आणि शिंदे सेनेची छत्रपती संभाजीनगर शहरातील महायुती तुटल्याचे आधी शिवसेनेचे नते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले तर लगोलग भाजप नेते मंत्री अतुल सावे यांनीही पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटावर आरोप करीत युती तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यामुळे दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसत असले तरी ज्यांना तिकिट मिळाले नाही अशा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर गोंधळ घातल्याचे चित्र शहरवासियांना पहावयास मिळाले.
सरत्या वर्षातला सर्वात हिट राजकीय सिनेमा काल शहरावासीयांना पाहायला मिळाला. सत्तेतील प्रमुख दोन पक्षांचे लाखो कार्यकर्ते या 24 तासांच्या चित्रपटाचे प्रेक्षक होते. प्रत्येक तासाला उत्सूकता वाढविणाऱ्या या राजकीय चित्रपटाचा अखेर काय होतो, याची उत्सुकता प्रचंड ताणली गेली. या राजकीय चित्रपटाचे नायक होते पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, आ. प्रदिप जैस्वाल, आ. संजय केणेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ. अखेर युती तुटली अन आता खलनायक कोण हे ठरविण्याची जबाबदारी त्यांनी राजकीय प्रेक्षकांवर सोपवली आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या अहंकाराने युती तुटल्याचा आरोप आज सकाळी केला. शिरसाटांच्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला. शिंदे गटात एकवाक्यता नाही. नेत्यांची तोंडे दाही दिशेला आहेत असा आरोप मंत्री अतूल सावे यांनी केला. तर आम्ही युती तोडली नाही, शिंदे गटाने तोडली असा हल्लाबोल खा. डॉ. भागवत कराड यांनी केला.
मनपा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती साठी गेल्या आठवडाभरापासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. रोज बैठकांचे सत्र अन त्यातून न होणारा निर्णय. यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. अखेर आज सकाळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती होणार नाही असे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यालयात इच्छूकांनी गर्दी केली.
नेत्यांनी आश्वासन दिलेले कार्यकर्ते जमा झाले. काल शिवसेनेच्या इच्छूकांनी तिकीटासाठी संताप व्यक्त केला होता. आज भाजप कार्यालयात प्रचंड राडा झाला. भाजपच्या पदाधिकारी दिव्या मराठे यांनी थेट नेत्यांवर डोफ डागली. आम्ही सतरंजा उचलायच्या काय, मला कायम डावलले गेले. सावे-कराड यांच्यावर आरोप करीत मराठे यांनी जोरदार राडा केला. संताप व्यक्त करीत आमरण उपाषण करणार असल्याचा निश्चय केला. यामुळे भाजप कार्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. इतरही तिकीट नाकारलेले उमेदवार येथे दाखल झाले. काही महिलांनी जोरदार आरडाओरड करीत ठिय्या दिला. एका इच्छूकाने तर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा भदाने यांना तर भोवळ आली. अखेर पोलिस पथकासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात धाव घेत गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
इनसाईड सांजवार्ता, अंदाज खरा ठरला
युती तुटण्याच्या मार्गावर या मथळ्याखाली सायं.दैनिक सांजवार्ताने 23 डिसेंबर रोजीच वृत्त प्रसिद्ध केले होते. गेल्या वर्षभरापासून ज्या आक्रमकपणे भाजपने राजकीय हालचाली केल्या, राजकीय डावपेच आखले. ते पाहता त्यांची तयारी शिवसेना शिंदे गटापेक्षा कितीतरी पट अधिक होती. गेल्या सहा महिन्यात तर प्रत्येक नेत्याला भाजपच्या वरिष्ठांनी कामाचे टार्गेेटच ठरवून दिले होते. ही दैनंदिनी शहराध्यक्ष किशोर शिताळेंकडे अपडेट होत होती. महापालिका ताब्यात घ्यायचीच हा आदेश खुद्द केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीच दिल्याने सर्वच नेते कामाला लागले. या राजकीय घडामोडींवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष होते. ठाकरे गटाला कमजोर करण्याचे सारे हातखंडे भाजपने वापरले. त्याचबरोबर शिंदे गटावरही वॉच ठेवला. पालकमंत्र्यांना अनेकदा राजकीय डावपेचात अडकवले गेले. शिरसाट यांचे खंदे कार्यकत्यांवर भाजपने जाळे टाकले. शिरसाट-जंजाळ वाद, शिरसाट-जैस्वाल वाद, शिरसाट-भुमरे यांच्यातील राजकीय स्पर्धा याचा अलगद फायदा भाजपने उचलला. शिंदे गटाची ताकद कोणत्या भागात आहे याचा अभ्यास करण्यात आला. युती झाल्याचे अन न झाल्याचे परिणाम याचाही डाटा वरिष्ठांना पाठविण्यात आला. दुसरीकडे भाजप-शिवसेनेशी लढत देऊ शकेल असा विरोधक मनपात नाही, याचा अंदाज नेत्यांना आला होता. कमजोर झालेला ठाकरे गट, खैरे-दानवे वाद, कॉग्रेस, एमआयएम, वंचितची विभागणारी मते याचा अभ्यास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला. परिणामी युती करण्यापेक्षा वेगळे लढण्यातच दोन्ही पक्षांचा फायदा आहे यावर एकमत झाले. आता जहरी टिका न करता दोन्ही पक्ष लढतील असे दिसते.














