छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): समर्पण, शिस्त, धाडस आणि साहसाची प्रेरणादायी कहाणी म्हणजे समर्थ नगर येथील रतीश दिवाकर कुलकर्णी यांचा प्रवास. गेल्या १२ वर्षांपासून डायव्हिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या रतीश यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर आपल्या कौशल्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पॅडी मास्टर इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत असलेल्या रतीश दिवाकर कुलकर्णी यांनी आपल्या १२ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर दोन उल्लेखनीय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. रतीश यांनी मिळवलेले दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा विक्रम आणि सर्वात उंच मानवी रचनेचा विक्रम.
हे दोन्ही विक्रम साकारण्यासाठी उत्कृष्ट टीमवर्क, अचूक नियोजन, शिस्त, समन्वय आणि अत्यंत कौशल्याची आवश्यकता होती.
या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत अंदमान आणि निकोबार बेटांचे उप राज्यपाल अॅडमिरल डी. के. जोशी यांच्या हस्ते रतीश यांना प्रशस्ति पत्र
आणि पदक देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने हा सन्मान प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थ नगरमधून सुरू झालेला हा प्रवास अंदमानच्या अथांग समुद्रापर्यंत पोहोचला आणि अखेर दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या रूपाने इतिहासात नोंदला गेला. १२ वर्षांचा अनुभव आणि पॅडी मास्टर इन्स्ट्रक्टर म्हणून मिळवलेले कौशल्य आणि साहसाची आवड यामुळे रतीश यांनी आव्हानात्मक मोहिमांना यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली. छत्रपती संभाजीनगरपासून अंदमानच्या समुद्रापर्यंतचा रतीश दिवाकर कुलकर्णी यांचा प्रवास म्हणजे जिद्द, कौशल्य, साहस आणि देशाभिमानाच्या बळावर इतिहास घडविणारी प्रेरणादायी कहाणी आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














