सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत मस्के, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पठाडे, वैभव भालेराव, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी प्रतीक्षा भालेराव, प्रिया बनसोड, अब्दुल्लाही आदम, उमाकांत बोराडे, मनोहर अपार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती या एकता बहुउद्देशीय सप्ताह निर्मूलन व जादूटोण जन जागृती आजादी मार्फत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि ते समाजाचे जबाबदार नागरिक बनावेत या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत हा विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमात भाऊसाहेब पठाडे यांनी विद्यार्थ्यांना जादूटोणा विरोधी कायद्याची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रयोगातून भूत उतरवणे, करणी, भानामती, नरबळी, आणि चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक यांसारखे प्रकार कायद्यानुसार कसे गुन्हा आहेत, हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले व कोणत्याही घटनेमागील वैज्ञानिक कारण समजून घेण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. तसेच, आजारपणात मांत्रिकांऐवजी योग्य वैद्यकीय उपचार घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक निशान मस्के म्हणाले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि समाजात या कायद्याबद्दल जादूटोणा विरोधी कायदा व्यापक जागृती निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कृतीशील सहभाग नोंदवत अंधश्रद्धा विषयावर प्रश्न विचारून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश काळे यांनी केले तर आभार रमेश सोनवणे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, सागरे, ताटू, रमेश परदेशी, भास्कर अरविंद सोनवणे, अमोल गजानन दौड, पंकज सावंत, संगीता तायडे, नम्रता वडमारे, हर्षदा सानान्से, शैलेश मोरे यांनी परिश्रम घेतले.












