सिल्लोड, (प्रतिनिधी): येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आयोजित करण्यात आले.
विठू नामाच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. आजूबाजूच्या खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यासाठी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला होता. यावेळी मुलांनी धोतर, कुर्ता, गांधी टोपी आणि कपाळावर बुक्का लावून महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख दर्शवत विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.
तर मुलींनी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या. यासोबत टाळ, मृदुंग, चिपळ्या, वीणा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतः भजन गायली.
शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ङ्गज्ञानोबा माऊली तुकारामम आणि ङ्गपुंडलिक वरदे हरी विठ्ठलफ या जयघोषासोबतच स्वच्छतेचे महत्त्व दर्शवणारे फलक या दिंडीत विशेष आकर्षण ठरले.
शाळेच्या प्रांगणात दिंडी काढण्यात आली. पालकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि बाल वारकऱ्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला तसेच विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी फुगड्या, झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले. याप्रसंगी पायल मरकडे, गौरी घोडके, श्रुती बनकर, शुभ्रा पैठणकर, श्रावणी नाकिरे, तनुजा नेमाडे, आराध्या वानखेडे, ईश्वरी वेंडोले, वैष्णवी नेमाडे, वेदाली दरड, आरोही मतलबे, तनुश्री बेलेकर, सोनाक्षी पात्रे, ऐश्वर्या ठाले, ईश्वरी कुदळ, सोनाक्षी कल्याणकर, विधी कल्याणकर, देवयानी भाग्यवंत, मयुरी सुरडकर, आचल लोखंडे, अंजली ठाले या विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर आधारित कीर्तन व भजनांचे सादरीकरण केले.
गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तर या विद्यार्थ्यांना संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी भावना शाळेचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के व्यक्त केली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक रमेश सोनवणे, लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, रमेश परदेशी, कडूबा गीते, गणेश चव्हाण, भास्कर सागरे, अंगद काळे अरविंद सोनवणे, अमोल ताटू, गजानन दौड, डॉ. रमेश काळे, पंकज सावंत, हर्षदा सानान्से यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.













