मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! मंत्री आणि अधिकार्‍यांचे परदेश दौरे केले रद्द

Foto
मुंबई : देशातील वाढत्या इंधन संकटाच्या आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी स्वतःचा ताफा कमी केला. दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारही सक्रिय झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर कडक पावले उचलली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि सनदी अधिकार्‍यांचे यापूर्वी मंजूर झालेले परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कामाच्या निमित्ताने किंवा अभ्यासासाठी जे दौरे आखण्यात आले होते, त्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा भार कमी करणे आणि जनतेला काटकसरीचा संदेश देणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री शंभुराज देसाईंकडून दौरा रद्द
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी आपला नियोजित पॅरिस आणि लंडन दौरा तात्काळ रद्द केला आहे. देशातील इंधन बचत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. 

फक्त मंत्रीच नाही, तर अनेक बड्या सनदी अधिकार्‍यांच्या दौर्‍यांवरही या निर्णयाचा परिणाम झाला आहे. आगामी काळात होणारे विविध आंतरराष्ट्रीय करार आणि बैठका आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विमान प्रवास आणि त्यावरील होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.