औरंगाबाद- शहराच्या विकासासाठी कोट्यवधी देणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच राजकीय साठमारी करीत भाजप सेना नेत्यांनी लाज आणली. राज्य सरकारने दिलेला पैसाही खर्च न करणार्या या नतद्रष्ट मंडळींना विकास कशासोबत खातात याची मुळीच जाण नाही. स्वयंकेंद्रित राजकारण करणार्यांना विकासाची मुळीच पर्वा नाही. या लोकांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे, एवढे मात्र खरे! शहरवासीयांनी ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने सत्ता दिली. वर्षानुवर्षे ज्यांना विकासाच्या कामासाठी निवडून दिले. त्याच मंडळींनी विश्वासघात केला. आपसातील हेवेदावे, राजकारण करीत शहराचा खेळखंडोबा केला याचा प्रत्यय काल मुख्यमंत्र्यांसमोर आला. स्थानिक नेत्यांच्या हाती सोपविलेल्या शंभर कोटींची कशी लागणार यावर आता चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शहरावर विशेष लक्ष दिले आहे. स्थानिक नेत्यांना
समजुतीच्या चार गोष्टी सांगत विकासासाठी वेगात काम करण्याचा सल्ला त्यांनी वारंवार
दिला. विकासासाठी एकत्र अशी हाक देत त्यांनी पुन्हा एकवार शहराच्या विकासासाठी
पैसा कमी पडू दिला जाणार नाही हे स्पष्ट केले. दुर्दैव हेच की देणारा देत असताना
घेणारे हातच सशक्त नाहीत. टीव्ही सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रत्यय आला.
भाजप सेना नेत्यांचा परस्परांबद्दल असलेला आकस, विरोधी पक्षांची
नसलेली एकजूट यामुळे शहराचा विकास गाडा रुतला आहे. संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव
असलेले दोन नेते राजकीय अस्तित्वासाठी जनतेसमोर उणीदुणी काढतात, यापेक्षा दुर्दैव ते काय ! विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंना महापौरांसह नगरसेवकांना काम करू द्या, असा टोला लगावला आणि वादाला तोंड
फुटले. टीव्ही सेंटर हा भाग हिंदुत्ववादी विचारसरणीचा. शिवसेनेने या भागात चांगली
पाळेमुळे रोवली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा भारतीय जनता पार्टीने
चंग बांधला आहे. कालच्या सभेत सौम्य आणि कट्टर हिंदुत्ववादी यांच्यातली दरी स्पष्ट
दिसून आली. भारतीय जनता पार्टीचे नेते भाषण करीत असताना जमावातून विरोधी सूर उमटत
होते तर शिवसेनेची नेते मंडळी भाषण करीत असताना टीकाटिप्पणी होत होती. यातच राजकीय
साठमारीचे दर्शन घडले. महापौर घोडेले यांनी शहराच्या विकासासाठी सरकारकडून आवश्यक
असलेल्या मदतीचा पुनरुच्चार केला. तर सिडको हडको फ्रीहोल्ड केल्याचे श्रेय एकट्या
भाजपचे नाही असे सांगत खासदार खैरे शिवसेनेने केलेल्या प्रयत्नाचा पाढा वाचला.
आमदार सावेंनी फारशी टीका न करता भाषण आवरते घेतले. तरी बागडे नानांनी मात्र खैरे
वरचा राग पुन्हा एकदा काढला. मुख्यमंत्र्यांसमोर या दोन पक्षातील वादावादी समोर
आली. आ. जलील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाजप सेनेला झोडपून काढले. आमदार
सुभाष झांबड यांनी शहरातील कचरा पाणीप्रश्न यासह इतर योजनांचे वाटोळे कोणी केले हे
जनतेला सांगावे,
असे सांगत टीका केली.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा...
सिडको हडको परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही
वर्षात या भागात भाजपनेही चांगले बस्तान बसविले आहे. सिडको हडको फ्रीहोल्ड
झाल्याचे भाजपने या भागातील मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचा प्रत्यय कालच्या कार्यक्रमात आला. शिवसेनेच्या बरोबरीनेच भाजप नेते
कार्यकर्ते मंडळींनी पोस्टरबाजी केली होती. सेना-भाजपच्या युतीबाबत अजूनही निर्णय
झाला नाही. त्यामुळे वेगळे लढण्याचे ठरले तर भाजपच्या उमेदवाराला फायदा व्हावा
याची काळजी या कार्यक्रमातून घेण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचे व्हीजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भाषण करण्याऐवजी दोन्ही
पक्षातील नेत्यांना चार गोष्टी सुनावल्या. शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि
औद्योगिक दृष्ट्या प्रगतिशील बनवण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त
केली. इतर शहरांचे दाखले देत यांनी पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था, स्वच्छता यासह पाणी प्रश्नावरही
उपाययोजना सांगितल्या. तुम्ही एकदिलाने काम करा, पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.