मुख्यमंत्र्यांची घोषणा वांझोटी ; शहरात पाण्याच्या कटकटी
सतीश जोशी
छत्रपती संभाजीनगरः आज बरोबर महिना झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विविध विभागांच्या उझनभर अधिकाऱ्यांसह ९०० मिमी व्यासाच्या पाईपलाईन आणि २६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्धघाटन केले होते. त्यावेळी बोलताना जाहीर केले होते की, आता पाण्याचे दिवस घटणार. मात्र शहरासाठी २६ एमएलडी पाणी मृगजळ ठरले आहे. ना पाणी वाढले ना पाण्याचे दिवस घटले. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांना चक्क खोटे ठरविले आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून शहरात धोधो पाऊस कोसळतो आहे. शहरातील नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर, ओसाड जागा पाण्याने काठोकाठ भरल्या आहेत. पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसते. मात्र शहरवासियांच्या घरात पाण्याच्या टाक्या कोरड्याठाक आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ८ ते ९ दिवसांची वेटिंग शहरवासियांना करावी लागते. निसर्गाने भरभरून दिले तरी व्यवस्थेच्या करंटेपणामुळे हंडे रिकामेच आहेत.
या आज सकाळी जुन्या शहरातील काही भागांना ९ व्या दिवशी पाणी पुरवठा झाला. तब्बल
९ दिवसांनी आलेल्या नळाच्या पाण्याला जोर नव्हता. कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याने तासभर पाणी येऊनही पाण्याची टाकी भरली नाही, असा संताप अनेकांनी व्यक्त केला. अनेकांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन लावले. एवढे कमी दाबाने पाणी कसे, असा सवाल विचारला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. जुन्या शहरासाठी शहागंज आणि क्रांतीचौक या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. जवळपास ३० वाडाँना येथून पाणी पुरवठा होतो.
कुठे गेले पाणी...
दरम्यान, गेल्या महिन्यात २३ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिरिक्त २६ एमएलडी पाण्याची घोषणा केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर त्यांनी शहरवासियांना पाण्याचे दिवस घटणार असे आश्वासनही दिले. मात्र पाण्याचे दिवस कमी झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार ५ व्या दिवशी पाणी यायला हवे होते. मात्र अजूनही ८ ते ९ दिवसांनी पाणी दिले जाते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनाही खोटे ठरविले असेच म्हणावे लागेल.