छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात 6 ठार तर 10 जण जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रुग्णालयात जाऊन
जखमींची विचारपूस केली. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरही पुलाचा भाग कोसळल्याने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सायंकाळपर्यंत जबाबदारी निश्चित करा, असे आदेश फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दादाभाई नौरोजी मार्गापलीकडे जाण्यासाठी वापरात असलेल्या पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी भरगर्दीच्या वेळी भरधाव वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जण ठार आणि 33 जण जखमी झाले. अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), जाहिद खान (32), भक्ती शिंदे (40), तपेंद्र सिंग (35), मोहन कायगडे (50) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील प्रभू, तांबे या जीटी रुग्णालयातील परिचारिका आहेत. त्या काम संपवून घरी परतत होत्या. 11 जखमींना जी. टी. आणि 17 जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.