मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी पुण्यातील 40 एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेण्यात आल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे या जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ 500 रुपये स्टँपड्युटी आकारण्यात आल्यानेही कागदोपत्री पुरावाच समोर आला. त्यानंतर, विरोधकांनी याप्रकरणावरुन सरकारला लक्ष्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी पार्थ पवारांना वाचवलं जातं आहे का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला गेला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच याबाबत उत्तर देऊ शकतील असं शरद पवार म्हणाले होते. ज्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात, ते पाहिले पाहिजे. याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे. अमेडिया एलएलपी कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. तर त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची एक टक्के भागीदारी आहे, असे आरोप विरोधकांनी केले. तरीही पार्थ पवार यांना वगळून दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात. तुम्ही आम्ही यावर उत्तर देऊ शकत नाही. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार प्रकरणाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
या प्रकरणात करण्यात आलेला आहे. यामध्ये सह्या करणारे लोक, व्यवहार करणारे यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जे काही कंपनीचे अधिकृत सह्या करणारे लोक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसंच सरकारमधल्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, आम्ही कुणाला वाचवणारही नाही. जे काही झालं आहे ते नियमांनुसार झालं आहे. मी यापूर्वीही सांगितलं आहे की या गुन्ह्याचा तपास सुरु असताना कुणाचाही सहभाग आढळला तरीही आपल्याला कारवाई करावीच लागते. त्यामुळे अतिशय नियमांनुसार ही कारवाई आपल्याला करावीच लागते. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सांगितलं आहे.