औरंगाबाद: चिकलठाणा परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या कचरा डेपोत आज कर्मचार्यांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने ती संशयित वस्तू ताब्यात घेतली आहे.
आज दुपारी मनपा कर्मचार्यांना चिकलठाणा भागातील कचरा डेपोच्या ठिकाणी कचर्याच्या ढिगार्यामध्ये संशयित वस्तू आढळून आली होती. ही माहिती कर्मचार्यांनी घनकचरा विभागाला दिली. दरम्यान, पोलिस व बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन ती संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना विचारले असता, सदर वस्तू म्हणजे पोलिस दलातील अश्रूधुरांची नळकांडी होती. ती नळकांडी कालबाह्य झालेली होती, अशी माहिती त्यांनी दिली. ही माहिती वार्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.