शटडाऊनमुळे शहरात निर्जळी; शेड्युल एका दिवसाने पुढे ढकलले जाणार

Foto

औरंगाबाद:  शहराचा पाणी पुरवठ्याचे नियोजन अगोदरच कोलमडलेले असताना आज शुक्रवारी विद्युत व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने १२ तास जायकवाडी कडून  शहरात पाण्याचा एक थेंबही येणार नसल्याने याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठा च्या नियोजनावर होणार असून, पाणीपुरवठ्याचे शेड्युल एका दिवसाने पुढे ढकलले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी या बारा तासांच्या शटडाऊनमुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरिता किमान चार दिवस लागणार असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून शहराचे पाणी पुरवठा चे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक वसाहतींमध्ये सहा ते आठ दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक अक्षरक्ष त्रस्त झाले आहे. पाणी टंचाईला वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा हे कारण असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज कंपनीने जायकवाडी व फारोळा येथील रिंग मेन युनिटची जोडणी करण्यासाठी महापालिकेकडे शटडाऊनची मागणी केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी  १२ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. हे काम झाल्यानंतर महापालिकेच्या पाणी उपसा पंपांना अविरत वीज मिळेल, असे म्हटले जाते. या दुरुस्ती दरम्यान  सकाळी आठ वाजता संपूर्ण पंप बंद केले जाणार असून, रात्री आठ वाजता पंप सुरू केले जातील, असे असले तरी देखील जायकवाडी कडून शहरात पाणी येण्याकरिता रात्री १२ वाजू शकतात. शुक्रवारी ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता त्या भागात आता शनिवारी पाणी पुरवठा होईल. पुढील पाण्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे जाईल. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी देखील अगोदरच पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन पाहता या बारा तासांच्या शटडाऊन नंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याकडे का किमान चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे समजते.