सिल्लोड, (प्रतिनिधी): सोलापूर बसस्थानक परिसरातून मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता झालेले आणि कर्नाटकातील एका ग्रामीण भागात आढळलेले सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द येथील रहिवासी सांडू भाऊराव बोरसे यांची कर्नाटक पोलिसांच्या साहाय्याने व कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे बोरसे कुटुंबावर ओढवलेले मोठे संकट टळले असून सर्वत्र सुटकेचा श्वास सोडला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, सांडू भाऊराव बोरसे हे मागील दोन महिन्यांपासून अचानक घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. ते सोलापूर परिसरातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर, कुटुंबीयांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे छत्रपती संभाजीनगर शहराचे जिल्हाध्यक्ष विजय म्हस्के पाटील यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणी योग्य त्या मार्गदर्शनासाठी व सहकार्यासाठी विनंती केली.
या प्रकरणी विजय म्हस्के पाटील यांनी प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर पाठपुरावा करत कर्नाटक येथील संबंधित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कर्नाटक पोलीस उपअधिक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस उपनिरेक्षक हारून अक्तर यांनी तातडीने सूत्रे हलवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा व मोबाईल लोकेशनचा वापर करून पोलिसांनी अचूक माग काढला आणि कर्नाटकातील संबंधित खेड्यात जाऊन सांडू बोरसे यांच्याशी संपर्क साधून त्यांची कायदेशीर कार्यवाही करत सुखरूप सुटका केली.
या संपूर्ण समन्वयाच्या मोहिमेदरम्यान छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य दराडे यांचेही सहकार्य लाभले. संबंधित पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे एका बेपत्ता नागरिकाचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करणे शक्य झाले आहे. या यशस्वी पाठपुराव्याबद्दल वांगी खुर्द येथील ग्रामस्थांनी विजय म्हस्के पाटील तसेच सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
माझ्या वांगी खुर्द गावातील ग्रामस्थ दोन महिन्यांपासून बेपत्ता आणि संकटात सापडले होते. कुटुंबीयांनी माझ्याकडे मदतीची विनंती केल्यानंतर मी संबंधित पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहून कायदेशीर व योग्य तो पाठपुरावा केला. अखेर प्रयत्नांनंतर सांडू बोरसे यांची सुखरूप सुटका झाली. एका चिंताग्रस्त कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला आहे. यातच माझ्या सामाजिक कार्याचे खरे समाधान आहे.
- विजय म्हस्के पाटील,
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती,
जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर शहर














