मनपाचे बुजगावणे उभारुन नागरिकांनी केला निषेध

Foto
जय भवानीनगर ते मुकुंदवाडी रस्त्यावरुन प्रशासनाकडून मिळाले फक्‍त आश्‍वासने
 जयभवानी नगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या या मुख्य रस्त्याचे काम मनपाने लवकरात लवकर करावे यासाठी आज संतप्त नागरिकांनी मनपाचे बुजगावणे लावून निषेध  केला. या रस्त्यांबाबत प्रशासन कायम टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे.त्यामुळेच या रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडल्याचे नागरिकांनी सांगितले. 
या रस्त्यासाठी शासनाने विशेष निधीतून 5 कोटी मंजूर केले होते. मनपाने निविदेसह वर्क ऑर्डर मंजूर केली मात्र यापुढे मनपाची गाडी पुढे गेलीच नाही. सदर काम थंड बस्त्यात गुंडाळले गेले. आता हे काम लोकप्रतिनिधीच्या निधीतून पूर्ण होईल असे सांगत मनपा प्रशासनाने हात झटकले आहेत. जय भवानी नगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या रस्त्यावर एक एक फुट खोल खड्डे पडले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तसेच डांबरीकरणाकडे देखील कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी रस्ता जास्तच खराब झाला. याठिकाणी दररोज अपघात होतात. रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.येथील काम लवकरात लवकर न केल्यास मनपा विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा राहुल इंगळे, बाळासाहेब शिंदे, गणेश विसपुते, मुकुंद पानचावरे, बालाजी जाधव, प्रकाश धुर्वे, कार्तिक मैद,श्याम जाधव,बापू ,भागवत पवार, रमेश पवार, बबन पंडित यांनी दिला.