महाराजस्व समाधान शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा : आमदार संजना जाधव

Foto
चापानेर येथे ९० प्रमाणपत्रांचे केले वाटप

कन्नड, (प्रतिनिधी) शासनाच्या महाराजस्व समाधान शिबिरात पाणंद रस्ते, शिव रस्ते, वैयक्तिक लाभाच्या योजना, रखडलेले फेर आदींचा जागेवर निपटारा करण्यात येत आहे. या शिबिरांचा नागरिकांनी लाभघ्यावा, असे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले.

कन्नड तालुक्यातील चापानेर येथे ७ मार्च रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिराचा शुभारंभ आमदार संजना जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला.

 दरम्यान उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शिबिराच्या आयोजनामागील शासनाची भूमीका स्पष्ट केली. विद्यार्थी, शेतकरी, महिलांना प्रमाणपत्रांसाठी कार्यालयात तहसील चकरा माराव्या लागू नयेत, नवीन शासननिर्णय नागरिकांना समजले पाहिजे यासाठी शिबिर घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  तहसीलदार सारिका भगत, माजी जि. प. सदस्य किशोर पवार, डॉ. अशोक पवार यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिरात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीयर, उत्पन्न, रहिवाशी असे ९० प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. चापानेर मंडळातील पेंडिंग असलेले फेरफार मंजूर करण्यात आले. 

भूमी अभिलेख विभागाच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. काही तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्या मंदाताई बोलधणे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, निलेश राठोड, भूमी अभिलेख उपअधीक्षक कैलास निसाळ, अशोक निसाळ, विकास वाघ, सुकदेव पवार, बाबूराव सातदिवे, कल्याण पवार, रुस्तुम घुले उपस्थित होते.