औरंगाबाद : कौटुंबीक राजकीय वारसा लाभलेल्या अतुल सावे यांना मनपा निवडणुुकीत पराभव पाहावा लागला. पराभव होऊनही सामाजिक व राजकीय कार्य न सोडता अविरतपणे पक्षाचे काम केल्याने सावे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. गेल्या 20 वर्षांत भाजपमध्ये अनेक चढ-उतार पाहत संघर्ष केल्यामुळेच त्यांना आज राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
मूळगाव लातूर असलेले अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे व्यवसायानिमित्त औरंगाबाद शहरात आले. त्यांनी सवेरा ट्रॉन्सपोर्टच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर अंजली व संगीता सिनेमा थिएटर व उद्योगाला सुरुवात केली. 1988 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोरेश्वर सावे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविला. त्यानंतर सेनेच्या पाठिंब्याने 1989 महापौरपद मिळविले. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर लोकसभेत विजय. त्यानंतर 1991 मध्ये सेनेच्या तिकीटावर सावे यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. 1996 मध्ये सेना नेत्यांशी वादानंतर सेनेला मोरेश्वर सावे यांनी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव अतुल सावे यांनी 2000 च्या मनपाच्या वेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. समर्थनगरातून निवडणूक लढविली. पण सेनेच्या आनंद तांदुळवाडीकर यांनी त्यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव केला. पराभवाने खचून न जाता त्यांनी पक्ष कार्य निष्ठेने केले. त्यामुळे त्यांना भाजपाने शहराध्यक्षपद दिले.
शहराध्यक्षपदानंतर प्रदेश उपाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली. 2014 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून त्यांनी विजय मिळवला. गेली साडेचार वर्षे त्यांनी शहराचे अनेक प्रश्न विधिमंडळात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोतील घरांचे लिज होल्डचे फ्रि होल्ड करण्याचा निर्णय सावे यांनी पुढाकार घेऊन सोडविला. सावे हे शांत स्वभावाचे मनमिळावू नेते आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना राजकारणात कोणी शत्रु नाही. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. सावे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी जिल्ह्यातील भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सावे यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे सावे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली. सावे हे उद्योजक आहेत. राजकारणात असतानाही उद्योग आणि राजकारण यांच्यात समन्वय साधत त्यांनी उद्योगक्षेत्रात ही नाव कमविलेले आहे. सावे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग, खनीकर्म व वक्फ बोर्ड अशी खाती दिली आहेत. औरंगाबाद शहर उद्योगनगरी म्हणूनही उदयास आलेली आहे. डीएमआयसीचे काम सुरू आहे. यापुढे येथे मोठे उद्योग सुरू व्हावेत यासाठी सावे यांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. खनीकर्म खात्यामार्फत जिल्ह्यातील अवैध उत्खननाला आळा बसविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या पूर्व मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन एमआयएमला थोपविण्यासाठी वक्फ बोर्ड खातेही मुख्यमंत्र्यांनी सावे यांना दिले आहे. या मार्फत मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सावे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सावे हेे माळी समाजाचे असून माळी समाजासह ओबीसीमधील अन्य समाजाची नेतेमंडळीही सावे यांच्याशी जुळलेली आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मोठ्या अपेक्षा सावे यांच्याकडून आहेत.











