छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी शहरात तिरंगा यात्रा निघणार आहे. औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून ही तिरंगा यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी भाजप नेत्यांनी प्रचंड ताकद लावली असून किमान ५० हजारांहून अधिक गर्दी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आज सकाळी मंत्री अतुल सावे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे आदी नेत्यांनी यात्रा मार्गाची पाहणी केली. या रॅली मार्गाची पाहणी करून सहभागी होणार्या नागरिकांच्या सोयीसुविधांबाबत अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या. पोलिस आयुक्त प्रवीण पवार रस्त्यावर उतरले असून शहरातील दोन डीसीपींसह इतर अधिकार्यांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे. ही रॅली (दि.१४) दुपारी २ वाजता महात्मा फुले चौकडून क्रांती चौकाच्या दिशेने निघणार आहे. या भव्य तिरंगा यात्रेत मराठवाड्यासह जळगाव व इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात देशप्रेमी हजेरी लावणार असल्याचेही माहिती मंत्री सावे यांनी दिली.
युवकांसाठी शक्ती पणाला
या तिरंगा यात्रेत तरूण मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी विविध शाळा महाविद्यालयात जाऊन नेत्यांनी तरूणांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
शहरातील सुमारे सर्वच महाविद्यालयांतून तरुण, तरुणी हजेरी लावणार आहेत. त्यासोबतच कोचिंग क्लासेसमधूनही मोठ्या संख्येने तरूण सहभागी होणार आहेत. तिरंगा यात्रेनिमित्त तरूणांना आकर्षित करण्याची संधी भाजपने साधली आहे.
क्रांतीचौकात मोठा बंदोबस्त...
तिरंगा रॅलीचा मुख्य कार्यक्रम क्रांतीचौकात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच रॅलीच्या मार्गावरही प्रत्येक ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे.
मंत्र्यांची मांदियाळी...
भाजपच्या या तिरंगा यात्रेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पणनमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदींची उपस्थिती राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर स्वागत
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे समवेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचेही आगमन झाले.
राज्याचे इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. सुहास शिरसाट, आ. अनुराधाताई चव्हाण, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.,पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस हे मोटारीने जालनाकडे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.













