वाळूज परिसरात ४ जुलै पासून कर्फ्यू
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाळूज परिसरातील ७ ग्राम पंचायतींमध्ये ४ ते १२ जुलै अशा ९ दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली. शहरातही परिस्थिती बिघडली तर १० जुलैपासून कर्फ्यू लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राज्यशासनाच्या मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाउनच्या नव्या नियमावलीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी म्हणाले, राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. मनपा क्षेत्रात दुकाने सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र मॉल आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. रेस्टॉरंटला होम डिलिव्हरी ची परवानगी आहे मात्र खुली राहणार नाहीत. दारूच्या दुकानाच्या बाबतीत शहरात डिलिव्हरी सुरु राहील दुकाने मात्र उघडी राहणार नाहीत. दुसरे महत्त्वाचे बदल म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी काम करू शकतील. शिकविणे आणि कोचिंग क्लासेसला परवानगी दिलेली नाही.
केश कर्तनालय, ब्युटी पार्लर उघडणार
शहरातील केसकेश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करता येतील. अटी शर्तीची पूर्तता करीत व्यवसायिक दुकाने उघडू शकतात. ग्रामीण भागातल्या व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. जिल्हा बंदी कायम असून जिल्हा बाहेर जाणाऱ्यांना प्रशासनाकडून पास घ्यावा लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरातील लोकप्रतिनिधी सोबत बैठक झाल्याचे सांगून प्रशासन जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे लोकप्रतिनिधींनी सांगितल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वाळूज भागात सात ग्रामपंचायतींमध्ये कर्फ्यू !
औद्योगिक क्षेत्रात वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाळूज परिसरातील सात गावांमध्ये ४ ते १२ जुलै असे ९ दिवस कर्फ्यू लावल्याची घोषणा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी केली. या काळात दूध तसेच दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची किराणा आणि इतर दुकाने मात्र बंद राहणार आहेत. शहरातून वाळूजला जाणारे आणि वाळूज येथून शहरात येणाऱ्यांसाठी पास आवश्यक आहे. त्याशिवाय कोणालाही शहरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच वाळूजमध्येही शहरातून येणाऱ्या व्यक्तीला पास शिवाय प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोनाचा संसर्ग पाहता उद्योगांनीही आता कमीत कमी मनुष्यबळात काम करावे, असे आवाहन उद्योजकांना केल्याचे त्यांनी सांगितले.
शहरासाठी इशारा !
दरम्यान, आज मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानूसार शहरात लगेच कर्फ्यू लावणे शक्य नसल्याचे सांगून पुढील आठ दहा दिवस परिस्थितीचे निरीक्षण केले जाणार आहे. पॉझिटिव केसेस अशाच वाढत्या राहिल्या तर मात्र १० जुलैपासून शहरातही कर्फ्यूची घोषणा होऊ शकते असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.