बांगलादेशमध्ये यादवीसदृश परिस्थिती, २८ जिल्ह्यात हिंसाचार, जाळपोळ, बॉम्बस्फोट, अनेक अटकेत

Foto
नवी दिल्ली : सन २०२४ साली झालेल्या सत्तांतरापासून सातत्याने अस्थिरता आणि अराजकाचा सामना करत असलेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एका  तणाव आणि हिंसाचाराचं वातावरण निर्माण झालं आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या संभाव्य देशवापसीच्या चर्चांदरम्यान अवामी लीगचे समर्थक रस्त्यावर उतरल्याने तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशातील २८ जिल्ह्यात हिंसाचार  उफाळून आल्याने देशात यादवीसदृश स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीदरम्यान, शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा दलांच्या तैनातीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

बांगलादेशमधील खगराछडी, नारायणगंज, माणिकगंज आणि पाबनासह अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. मिळत असलेल्या वृत्तानुसार देशातील २८ जिल्ह्यांत हिंसाचार पसरला असून, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटादरम्यान अनेक वाहनांना आणि घरांना लक्ष्य करण्यात आलं आहे. तर  पाबना येथे बीएनपी आणि अवामी लीगच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आले.

निर्बंध लादल्यानंतरही अवामी लीगच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केल्याने सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.  हिंसाचार तोडफोड आणि जाळपोळीप्रकरणी पोलिसांनी झटपट कारवाई करत शेकडो लोकांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गाझीपूरमधील टोंगी येथील अवामी लीगची माजी विद्यार्थि नेता असलेल्या तानिया अख्तर  तपोशी हिचाही समावेश आहे.

दरम्यान, अवामी लीगचे चार मोठे नेते शेख हसिना यांच्या देशवापसीसाठी पेट्रापोल सीमेवर पोहोचल्याने आणि त्यांनी भारत बांगलादेश सीमेवरील  संभाव्य रस्त्यांचा आढावा घेतल्याचे वृत्त  आल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.  यादरम्यान, बांगलादेशमध्ये निमलष्करी दलांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढवण्यात आली आहे. तसेच बांगलादेश सरकारने शेख हसिना  यांची देशवापसी रोखण्यासाठी भारताकडे प्रत्यार्पण करारांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.