बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर उत्साहात

Foto
३७ विद्यार्थी इंग्रजीच्या पहिल्या पेपरला अनुपस्थित

गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला असून, संपूर्ण तालुक्यात परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडल्याचे चित्र दिसून आले.

तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांवर एकूण १३२४ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यापैकी ३७ विद्यार्थी इंग्रजीच्या पहिल्या पेपरला अनुपस्थित राहिले. गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एकूण ८३२ विद्यार्थ्यांची नोंदणी असून त्यापैकी ८०७ विद्यार्थी उपस्थित तर २५ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर राजाबाई माधवलालजी धूत कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गंगापूर येथे एकूण ४९२ विद्यार्थ्यांपैकी ४८० विद्यार्थी उपस्थित असून १२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

 दोन्ही परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली शासनाच्या आदेशानुसार परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पार पडली.

-- इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार --
पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थी पेपर अवघड गेल्याने नाराज दिसून आले, तर अनेक विद्यार्थी पेपर चांगला गेल्याने आनंदी होते. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर पालक व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

एकूणच बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस गंगापूर तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व यशस्वीपणे पार पडला. यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. रामराव चव्हाण, उपप्राचार्य डॉ. वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ. विशाल साबणे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी यांनी परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले.