सिल्लोड (प्रतिनिधी) आमदार अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील दुर्गामाता मंदिर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दुर्गामाता संस्थान येथे भेट देऊन करण्यात आलेल्या सोयी-सुविधा व उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला. नवरात्र उत्सवादरम्यान दुर्गामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ लक्षात घेता सालाबादप्रमाणे मंदिर परिसरात प्रखर विद्युत रोषणाई, रस्त्यालगत प्रत्येक खांबावर दिव्यांची व्यवस्था, स्वच्छता, वाहनांसाठी पार्किंग तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी व्यवस्था नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी या सर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. नवरात्र उत्सव काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी नगर परिषद व महावितरणसह संबंधित शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक त्या सर्व सुविधा सुरळीत ठेवाव्यात, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
उत्सव काळात स्वच्छता, विद्युत रोषणाई, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, अशोक बनसोड, दुर्गामाता संस्थानचे अध्यक्ष दत्ता शेजुळ, शिवा टोम्पे, संजय मुरकुटे, सुरेश शर्मा, जगन्नाथ कुदळ तसेच कृष्णा वाघ, दिलीप वाघ, कैलास इंगे, देविदास वाकडे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















