१० हजारांची लाच घेताना लिपिकास तपोवन एक्स्प्रेसमधून अटक

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणातील जप्तीची नोटीस थांबवून थकलेल्या हप्त्यांसाठी मुदतवाढ मिळवून देण्याच्या नावाखाली १० हजार रुपयांची लाच घेणार्‍या पडेगाव येथील मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन कार्यालयातील खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ुधवारी (दि.११) रंगेहाथ पकडले. रेल्वेस्टेशनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. सागर कारभारी जाधव (३२, रा. लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
३५ वर्षीय तक्रारदाराने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेतून व्यवसायासाठी देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र काही हप्ते थकल्याने बँकेने त्यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये जप्तीची नोटीस काढली होती. त्यावर उप-निबंधक कार्यालय पडेगाव येथील खासगी लिपिक जाधव याने तक्रारदाराकडे ही नोटीस दप्तरी दाखल करण्यासाठी, प्रेस नोट न देण्यासाठी आणि थकलेल्या हप्त्यांची मुदत वाढवून देण्यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी २ हजार रुपये त्याने यापूर्वीच फोन पेद्वारे घेतले होते. 
बुधवारी (दि.११) तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आरोपी सागरने तक्रारदाराला तपोवन एक्सप्रेसमध्ये पैसे घेऊन बोलावले होते. दुपारी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी उभी असताना, तक्रारदाराकडून उर्वरित १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने सागरला रंगेहाथ पकडले. 
त्याच्याकडून लाचेची १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आली. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक राजीव तळेकर, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, संतोष तिगोटे, अंमलदार राजेंद्र नंदिले, सचिन बारसे आणि सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.