औरंगाबाद- पेट्रोलच्या वाढत्या भाववढीने सामान्य नागरिक त्रस्त असताना औरंगाबादमध्ये पेट्रोल पंप चालकांकडून ग्राहकांना लुटण्याचा नवीन प्रकार समोर आला
गेली काही दिवस पेट्रोलचे भाव सारखे कमी होत आहेत याचा ग्राहकांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळू लागला होता. यातच हर्सूल टी पॉईंट येथील एच पी पेट्रोल पंप वर ग्राहकांना २६ तारखेला भरलेल्या पेट्रोलच्या बिलावर तीन दिवस आधीची तारीख म्हणजे २३ तारीख येत होती. हा प्रकार एका ग्राहकाने व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला आहे. या ग्राहकाने सोमवार ( दि. २६ ) रोजी पेट्रोल खरेदी केले असता त्यांनी पेट्रोल भरल्याची पावती मागितली मात्र पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीने पावती देण्यास टाळाटाळ केली. जेव्हा ग्राहकाने पावती मिळावी म्हणून जास्त मागणी केली तेव्हा पावती ग्राहकाला दिल्या गेली मात्र त्या पावतीवर तीन दिवस आधीची तारीख येत असल्याचे निदर्शनास आले. सकाळी दिलेल्या पावती बद्दल विचारणा केली असता ग्राहकाला दादागिरीच्या स्वरात ऑपरेटर म्हणला की तेव्हा पावती मी दिलेलीच नाही. संबंधित ग्राहकाने हा प्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करून सांजवार्ताच्या प्रतिनिधीला दिला, तेव्हा सांजवार्ताचे प्रतिनिधी स्वतः त्या ठिकाणी जाऊन शाहनिशा केली असता पेट्रोल भरणा पावती दुसऱ्या मशीन मधून दिली गेली. आमच्या प्रतिनिधीने याप्रकाराविषयी ऑपरेटरला विचारले असता मशीन मागच्या सात दिवसापासून बिघडली असल्याचे समजले. मात्र मशीन बंद असूनही त्याच मशीन मधून पेट्रोल भरल्या जात असल्याने ग्राहक संतप्त झाले होते. कोणतीही टेक्निकल बिघाड असली तर दुरुस्ती करण्यास किती वेळ लागतो असे ग्राहकांचे म्हणणे आहे. ही फसवणूक असल्याचे देखील ग्राहक म्हणत आहेत. ग्राहकांना आधी २३ तारखेच्या पावत्या दिल्या जात असल्याचे आमच्या प्रतिनिधिंनी उघड केल्यानंतर २६ तारखेच्या पावत्या देण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर ग्राहकांना हस्तलिखित पावत्या दिल्या जाऊ लागल्याने यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे असे लक्षात आले. याप्रकरणी पुरवठा अधिकारी भारत कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
















