औरंगाबाद- बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासकीय अनुदान लागणाऱ्या शाळा तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वरदहस्ताचा फायदा घेत शासनाची लुबाडणूक करणाऱ्या संस्थांना चांगलाच दणका बसला आहे.
जिल्ह्यात केंद्र सरकारच्या मदतीने राजीव गांधी बालकामगार प्रकल्प
चालवल्या जातो. या प्रकल्पांतर्गत १४ वर्षांपर्यंतच्या शाळेत न जाणाऱ्या
बालकामगारांना शिक्षणाचे धडे दिले जातात. चांगल्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या
या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. खासगी संस्थांनी बोगस
विद्यार्थी दाखवून शासनाचे लाखो रुपये लुटण्याचे काम सुरू केले. याबाबत असंख्य
तक्रारीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या होत्या. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल
किशोर राम यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या
प्रकल्पाची सखोल चौकशी सुरू झाली होती.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
बालकामगार प्रकल्पातील शाळांची चौकशी करण्यासाठी २७ पथके बनविली. या पथकांनी ग्रामीण तसेच
शहरी भागातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच हजेरी पटाची तपासणी
केली. या शाळांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये
विद्यार्थी नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या पथकाच्या
अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बालकामगार प्रकल्पातील १० शाळा तातडीने बंद
करण्याच्या आदेश दिले आहेत.
या शाळा होणार बंद..
सिल्लोड तालुक्यातील एक, कन्नड तालुक्यातील
एक, एन ९ मनपा शाळेत भरणारी बालकामगार शाळा, नारेगाव मनपा शाळेत भरणारी बालकामगार
शाळा, मुकुंदवाडी मधील जे सेक्टर ची शाळा, हीना नगर, किराडपुरा, राहुल नगर रेल्वे स्टेशन येथील शाळा
बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.