मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले आहे. राज्यातील पूरपरिस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना आणि पाणी तुंबण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा हाय-अलर्टवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा थेट आढावा घेतला. पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे असणार आहेत. तर, नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटी होण्याची भीती आहे.
मुंबई आणि महानगर भागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील पावसाळ्याच्या स्थितीवर भाष्य केले. निसर्गाने संपूर्ण महाराष्ट्राला वेढले असतानाच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर निसर्गाच्या कोपाचे सर्वात मोठे संकट घोंगावत आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्हा आणि शहरासाठी अत्यंत गंभीर इशारा जारी केला असून, या भागात तब्बल ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. परिस्थिती इतकी बिकट होऊ शकते की, या भागात ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झाला असून त्याचे रूपांतर 'मेजर डिप्रेशन'मध्ये झाले आहे. या हवामान प्रणालीमुळे नाशिक आणि विशेषतः त्र्यंबकेश्वरच्या घाटमाथ्यावर पावसाचा प्रचंड उद्रेक होणार आहे. येत्या ८ जुलैपर्यंत नाशिकमध्ये अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, उद्यासाठी (मंगळवार) नाशिकला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
प्रशासन अलर्ट मोडवर, शाळांना सुट्टी जाहीर
नाशिक जिल्हा आणि मनपा प्रशासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर आले आहे. संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने आधीच मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तात्काळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. "सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरचा प्रवास पूर्णपणे टाळावा," असे आवाहन प्रशासनाने केले आहे.