छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो) कॉफी सेंटरच्या आडून शहरातील विविध उच्चभ्रू आणि गजबजलेल्या भागांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात अखेर महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे. मंगळवारी (दि. २३) रात्री सिडकोतील कॅनॉट प्लेस, वेदांतनगर, उस्मानपुरा, टीव्ही सेंटर आणि सिडको एन-११ या
भागात प्रशासनाने एकाच वेळी धडक तोडफोड मोहीम राबवली. कॉफी पिण्याच्या नावाखाली कपल्ससाठी तयार करण्यात आलेल्या संशयास्पद स्पेशल केबिन्स, टेबल-खुर्चा आणि काळ्या काचांचा पोलिसांनी तगड्या बंदोबस्तात चक्काचूर केला, अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी मुख्य बाजारपेठांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत
तब्बल ४९ अवैध कॉफी सेंटर्सवर हातोडा चालवण्यात आला.
ज्या भागात शाळा, कॉलेज आहेत, तिथे मोठ्या संख्येने कॉफी सेंटर सुरू आहेत. याठिकाणी तरुण-तरुणींची मोठी वर्दळ असते. काळ्या काच लावून बाहेरून काही दिसणार नाही, अशी व्यवस्था कॉफी सेंटखर उपलब्ध करून दिली जाते. त्यात काही ठिकाणी मुलींची छेड काढण्याचे प्रकार वारंवार घडत
आहेत. मंगळवारी महापालिकेसह पोलिसांचे पथक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. सायंकाळी सातपासून कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, उस्मानपूरा येथे एकाचवेळी कारवाई सुरू करण्यात आली. ज्याठिकाणी तरुण-तरुणींना बसण्यासाठी 'स्पेस' तयार करून देण्यात आला होती, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांनी हातोड्याने तोडफोड केली. कॅनॉट प्लेस भागात १९ ठिकाणी तपासणी
करण्यात आली. त्यातील १२ ठिकाणी तोडफोड करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक बचाटे, घुसिंगे, राहुल मोरे, महापालिकेच्या उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक अजय सूर, सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई, सचिन काकनाटे सहभागी झाले होते.
कारवाई गोपनीय पद्धतीने
▶ शहरातील पाच भागांत गोपनीय पद्धतीने कारवाई करण्यात आली. कारवाई होणार हे फक्त महापालिका आयुक्त अमोल येडगे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार व संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनाच माहीत होते.
डिम लाईट व खास स्पेस
▶ ज्याठिकाणी कारवाया करण्यात आल्या त्याठिकाणी डिमलाइटसह खास स्पेस तयार करून देण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक कॉफी सेंटरमध्ये जागा कमी असतानाही दोन मजले तयार करून, त्यात छोटे जिने होते, वाढदिवस साजरे करण्यासाठी विशेष सोय होती. एका कॉफी सेंटरमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू असताना कारवाई करण्यात आली.














