जळगाव : जळगाव शहरातील एमजे कॉलेज महाविद्यालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून महेश भास्करराव सावदेकर हे त्या ठिकाणी कामाला होते. अनेक वर्षापासून पंधरा लाख रुपये महाविद्यालयात संस्थाचालकांना देऊन देखील महेश यांना संस्थाचालक कायमस्वरूपी केलं नाही. त्यानंतर कंत्राटी कामावरून देखील काढल्याने स्वतःच्या घरात विष प्राशन करून महेश सावदेकर यांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत सावदेकर यांच्या पत्नीने केला आहे.
जळगाव शहरात राहणारे देविदास कॉलनीतील राहणारे महेश सावदेकर (वय 52) हे जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय एम.जे कॉलेज या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामावर होते. सोमवारी त्यांची पत्नी यशोधरा या कामावर गेल्या होत्या, तर मुलगा देखील क्लासला गेला होता. त्यामुळे महेश हे घरी एकटेच असल्याने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली ही घटना त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला समजली त्यांनी तात्काळ त्यांचा भाऊ अविनाश सावदेकर यांनाही माहिती दिली.
महेश सावदेकर यांच्या पत्नी यशोधरा यांनी सांगितले की, मुळजी जेठा महाविद्यालय( एम जे कॉलेज) या ठिकाणी माझे पती कंत्राटी पद्धतीने कामाला होते. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या संस्थाचालकांना 15 लाख रुपये कायमस्वरूपी करण्यासाठी दिले होते. मात्र त्यांना त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यास सांगत होते आणि ते देखील काम करीत होते. संस्थेकडून त्यांना जास्त पगार दाखविला जायचा आणि तशी सही देखील घेतली जात होती, मात्र पगार देण्यावेळी त्यांना कमी रकमेचा पगार दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महेश सावदेकर यांनी त्यांच्या पत्नीला आधी सांगितले होते की, मला कामावरून काढून टाकले त्यांच्या हाता-पाया पडलो तरी देखील कामावर घेतले नाही. यापुढे महाविद्यालयात यायचे नाही असे ते वारंवार पत्नीला सांगत होते. त्याच तणावाखाली ते अनेक दिवसांपासून होते आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप सावधेकर यांच्या पत्नी यशोधरा यांनी केला आहे. त्यामुळे आत्महत्येस जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याआधी देखील महेश सावदेकर यांनी 21 जून रोजी आताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा देखील हेच कारण होते. परंतु आता पुन्हा त्यांनी विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांचा घरातच मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. ज्या संस्थेमध्ये काम करण्याकरिता सावधेकर यांनी 15 लाख रुपये दिले होते. यावेळी दिलीप रामू पाटील यांनी मध्यस्थी देखील केली होती असा आरोप सावधेकर यांच्या पत्नीने केला. तसेच संस्थेने कायम तर केले नाही. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले त्यानंतर देखील सावदेकर हे वारंवार महाविद्यालयात भेटण्याकरिता गेले होते. परंतु त्यांना कामावर घेण्याकरिता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती, असे सावधेकर यांच्या पत्नीने सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मुक्तीची नोंद करण्यात आली आहे याबाबत महाविद्यालयाच्या संस्थाचालकांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मृतदेह आणला महाविद्यालयाच्या प्रांगणात
महेश सावदेकर यांनी नोकरीवरून कंत्राटी कामावरून कमी केल्याच्या तणावाखाली आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह नातेवाईकांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आणला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संस्थाचालकावर कारवाई करीत नाही तोपर्यंत मृतदेह येथून घेऊन जाणार नाही अशी ,भूमिका नातेवाईकांनी घेतली होती यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.