हायवेवर उभ्या लॉरीला धडक, इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांचा करुण अंत, दरवाजे कापून बॉडी बाहेर काढण्याची वेळ

Foto
 त्रिशूर :  त्रिशूर महामार्गावर उभ्या असलेल्या लॉरीवर मागून कार आदळल्यामुळे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. यामध्ये तामिळनाडूत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही दुर्घटना रात्री ११.४० वाजताच्या सुमारास कैपामंगलममधील पनांबिक्कुन्नू येथे घडली. कार गुरुवायूरहून कोडुंगलूरच्या दिशेने जाताना हा अपघात झाला.

त्रिशूर जिल्ह्यातील कैपामंगलम येथे राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या मालवाहू लॉरीच्या मागील भागावर कार आदळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास पनांबिक्कुन्नू सेंटर येथे हा अपघात झाला अशी माहिती केरळ पोलिसांनी दिली आहे. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कार कापून उघडावी लागली, असे पोलिसांनी सांगितले.

अपघातात कारचा चक्काचूर, कापून काढण्याची वेळ
धडकेमुळे कारचा पूर्णपणे चुराडा झाला होता. प्रवाशांचे शव बाहेर काढण्यासाठी गाडी कापून उघडावी लागली. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी तामिळनाडूतील दिंडिगुल येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होतेङ्घङ्घ असे पोलिसांनी सांगितले. 

  रस्त्याच्या कामादरम्यान कारची लॉरीला धडक
पोलिसांनी सांगितले की, महामार्गावर त्याच दिशेने उभ्या असलेल्या लॉरीवर कार आदळली. अपघाताच्या वेळी त्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. कारमधील सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. धडकेमुळे कारचा चक्काचूर झाला आणि काही प्रवासी आतच अडकून पडले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन व बचाव दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

दोन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कारचा काही भाग कापून काढावा लागला. त्यानंतर बॉडी त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवगृहात नेण्यात आले.

कॉलेज आयकार्ड सापडले
अपघातस्थळी दिंडिगुल येथील पीएसएनए अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचे ओळखपत्र सापडल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.