'जमिनीवर हल्ल्यासाठी या, आम्ही वाट पाहतोय , तुम्हाला इकडेच गाडले जाईल' ट्रम्पनी इशारा देताच इराणच्या भूदलाचा इशारा

Foto
तेहरान : जागतिक राजकारण सध्या एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपलं आहे. एका बाजूला अमेरिकेच्या नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरचे संचालक जो केंट यांनी इस्त्रायल आणि इस्त्रायली लाॅबीच्या दबावाचा आरोप करत राजीनामा दिला, तर दुसरीकडे इस्त्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठ्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर भीषण हल्ला चढवला. यानंतर इराणने जे सांगितलं ते करून दाखवताना कतार गॅस प्रकल्पावर मिसाईल डागल्या. या घटनांमुळे आखाती देशांमध्ये युद्धाचा वणवा अधिकच पेटला असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा कतारवर हल्ला केल्यास इराणला 'संपवून टाकण्याची' धमकी दिली आहे. तसेच इस्त्रायल पुन्हा साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला करणार नाही, असे म्हटलं आहे. 

इराण भूदल कमांडरचा गर्भित इशारा
दरम्यान, ट्रम्प यांनी जमिनीवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर इराणच्या IRGC भूदलाने सैनिकांच्या तयारीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमेरिकेच्या कोणत्याही जमिनीवरील हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे. इराणी माध्यमांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक सैनिक म्हणतो, "काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रस्ताव दिल्याचे ऐकायला मिळाले. 

तुम्हाला याच मातीत गाडले जाईल
आम्ही कित्येक वर्षांपासून अशा संधीची वाट पाहत आहोत आणि आम्ही त्यासाठी 100 टक्के तयार आहोत." आमच्या दारूगोळ्याच्या पेटीतूनच आम्ही तुमच्यासाठी अशी थडगी केली आहेत की तुम्हाला याच मातीत गाडले जाईल. हा त्या प्रत्येकासाठी एक धडा असेल जो इराणच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करेल. इराणने आपल्या सैनिकांना 'कुराणाचे रक्षक' आणि 'देशाची अभेद्य ढाल' संबोधून युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

जो केंट यांचा 'लेटर बॉम्ब'
दरम्यान, एनसीटीसी  संचालक जो केंट यांनी आपल्या राजीनामा पत्रात अमेरिकन प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना केवळ इस्त्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे हे युद्ध लादले गेले.इस्त्रायलने अमेरिकन मीडियाचा वापर करून एक 'खोटा प्रचार' चालवला आणि ट्रम्प यांना युद्धाच्या जाळ्यात ओढले.