आकांक्षा देशमुख खून प्रकरणी पोलिस आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी, वसतिगृहातील विद्यार्थीनींचे जबाब नोंदविणे सुरू

Foto

औरंगाबाद- एमजीएम वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणीचा गळा दाबून निर्घुपणे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडे नऊच्या सुमारास एमजीएम वसतिगृहात उघडकीस आली होती. या घटनेला दोन ते तीन दिवस उलटुन गेले असलेतरी पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्याने पोलिसांचा तपास भरकटला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शुक्रवारी (दि.१४) सकाळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना तपासाविषयी काही महत्वाच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा.झेंडा चौक, पाटील मंडी, माजलगांव, जि.बीड, ह.मु. गंगा हॉस्टेल, खोली नंबर ३२४) ही तरूणी एमजीएम महाविद्यालयात फिजीओथेरेपी या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रथम वर्षाला शिकत होती. मंगळवारी रात्री नऊ वाजता वसतिगृहातील विद्यार्थीनींची हजेरी घेण्याचे काम सुरू होते, त्यावेळी आकांक्षा गैरहजर असल्याने वसतिगृह अधिक्षकांना संशय आल्याने त्यांनी आकांक्षाच्या खोलीत जावून बघीतले असता, तीचा मृतदेह खोलीत आढळुन आला होता. या घटनेनंतर वसतिगृह प्रशासनाने पोलिसांशी संपर्क न साधता आकांशाच्या खोलीची सफाई केल्यामुळे अनेक ठोस पुरावे नष्ठ झाले आहेत.

 

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आदींची उपस्थिती होती. पोलिस आयुक्तांनी वसतिगृहाची पाहणी केल्यावर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. आकांक्षा देशमुख हिच्या रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थीनीसह आजू-बाजूच्या रूममधील जवळपास ४० जणींची जबाब घेण्यात येणार असून त्यापैकी १५ ते २० जणींची जबाब पोलिसांनी आतापर्यंत नोंदवून घेतले आहेत.

 

 

आकांशाच्या रूममेटचा घेतला जबाब

 

आकांक्षा देशमुख हिच्यासोबत रूममध्ये राहणाऱ्या रूममेटचा जबाब पोलिसांनी शुक्रवारी नोंदवून घेतला. रूममेटने दिलेल्या जबाबानुसार तिची पॉलिटेक्निकची परिक्षा ७ डिसेंबर रोजी संपल्यावर ती ८ डिसेंबर रोजी आपल्या गावी गेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर ती शुक्रवारी सकाळीच वसतिगृहात परत आली असल्याचे तीने पोलिसांना सांगितले. तसेच आकांक्षा ही नेहमी अभ्यास करणारी आणि कष्टाळू विद्यार्थीनी असल्याचे तीने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले. 

 

वसतिगृहातील विद्यार्थीनी धास्तावल्या

 

आकांक्षा देशमुख हिचा वसतिगृहात खून झाल्याच्या घटनेने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनी धास्तावल्या आहेत. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थींनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने एमजीएम प्रशासनाच्या वतीने विद्यार्थीनींच्या पालकांशी संपर्क साधुन तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलींना काहीही होणार नाही असे सांगितले जात असल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.