पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाने बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घुसखोराने रात्री 3 वाजेच्या सुमारास डॉ. गोऱ्हे यांच्या घराच्या गच्चीवरून आत प्रवेश केला होता. सकाळी 7 वाजता बंगल्यातील सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी संशयिताला पकडल्याची माहिती आहे.
बॅगेत हातोडा, पकड आणि दोरी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या संशयित तरुणाच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे 10 मीटर लांबीची दोरी आढळल्याचे प्रथम माहिती अहवालात (FIR) नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी या तरुणाने घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद करून तोडले होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.