छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गॅस टंचाई लक्षात घेता आणि काळाबाजार रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस एजन्सीचे बुकिंगचे अधिकार काढले आहेत. ग्राहकांना केवळ ऑनलाइन किंवा कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच बुकिंग करावे लागणार आहे.
यापूर्वी अनेकदा डिलिव्हरी बॉयकडून सोयीनुसार बुकिंग करणे किंवा गॅस वितरणात एजन्सी स्तरावर हस्तक्षेप होण्याचे प्रकार घडत होते. हे प्रकार थांबवण्यासाठी आता डायरेक्ट कंपनी बुकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ग्राहकांना आता स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने सिलिंडर बुक करणे अनिवार्य झाले आहे. गॅस एजन्सीचालकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपला मोबाइल क्रमांक गॅस कनेक्शनशी अद्ययावत ठेवावा, जेणेकरून बुकिंग आणि ओटीपी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. नवीन नियमानुसार बुकिंग केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन आल्यावर त्याला हा ओटीपी देणे आवश्यक असेल. तो पोर्टलवर नोंदवल्याशिवाय डिलिव्हरी पूर्ण होणार नाही. यामुळे घरपोच वितरणात होणारी फसवणूक आणि काळाबाजार यावर आळा बसणार आहे.














