सिल्लोड, (प्रतिनिधी) : मध्ये सिल्लोड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ प्रभागरचना व मतदारयाद्या मध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याची तक्रार तालुका शिवसेनेच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
राजकीय सूडबुद्धीने विशिष्ट मतदारांवर जाणीवपूर्वक आक्षेप दाखल करून त्यांना मतदानापासून डावलण्याचे काम स्थानिक निवडणूक अधिकारी व भारतीय जनता पार्टीचे लोक करीत आहे प्रभाग रचना व मतदार याद्या या पारदर्शक व्हाव्यात . यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप खपून घेणार नाही, हा प्रकार थांबवा नसता जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार
विजयमाला पुपळवाड यांच्याकडे सदर तक्रार अर्ज सोपविला. याप्रसंगी कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, माजी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, सुधाकर पाटील, अकील वसईकर, प्रशांत क्षीरसागर, कुणाल सहारे, रवी गायकवाड, गौरव सहारे, आनंद अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सिल्लोड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ कार्यक्रम जाहीर झालेला असून अंतिम प्रभागरचना आणि प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचे काम स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत चालू आहे. प्रारूप मतदारयादी व अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झालेली आहे.
परंतु राजकीय स्वार्थापोटी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे व त्यांना राजकीय फायदा होण्याच्या उद्देशाने प्रारूप मतदारयाद्यामध्ये बदल करण्याचे कटकारस्थान रचल्या जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील करण्यात आलेल्या आहे. तरी प्रारूप मतदारयाद्या ह्या मा. निवडणूक आयोगाच्या निर्दे शानुसार प्रगणक गट न तोडता बनविण्यात आल्या आहेत. फक्त आता राजकीय सूडबुद्धीने व स्वार्थपोटी या प्रगणक गटांमध्ये फेरफार करून व निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्याचे व विशिष्ट मतदारांवर जाणीवपूर्वक काही एक संबंध नसतांना आक्षेप दाखल करून त्यांना मतदानापासून डावलण्याचा किंवा इतरत्र हलवण्याचे काम स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी व भारतीय जनता पार्टीचे लोक करीत आहे.
त्यामुळे प्रभागरचना, मतदारयादी तयार करीत असताना निवडणूक आयोगाने दिलेले सर्व नियमांचे व निर्देशांचे तंतोतंत पालन करणे संदर्भात संबंधितांना आदेशित करावे, अन्यथा विशिष्ट पक्षाला फायदा देण्याच्या उद्देशाने स्थानिक निवडणूक अधिकार्याने काम केल्यास त्यांच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल. व यामुळे होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाची राहील यांची नोंद घ्यावी असा इशारा या अर्जात देण्यात आला आहे. सदरील अर्जाच्या प्रति मुख्य निवडणूक यांना आयुक्त, जिल्हाधिकारी देखील देण्यात आल्या आहेत.